आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादाच्या संदर्भात भारतीय राष्ट्रवादाचा म्हणजेच हिंदुत्वाचा, राज्यशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करू इच्छिणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना या विषयाची ओळख करून देणे, त्यांना अध्ययनासाठी आवश्यक त्या संदर्भ साहित्याची माहिती करून देणे, हिंदुत्व चळवळीतील अभ्यासू कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे हा हेतू ठेवून गेली १४ वर्ष हा उपक्रम आयोजित करत असून त्यास वाढता प्रतिसाद मिळत आहे.

Learning objectives:

  • राष्ट्रवादाचा उदय व वाटचाल
  • राष्ट्रवादाचे भाष्यकार (विचारवंत)
  • राष्ट्रवादाचे भाष्यकार (राजकीय नेते)
  • राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय चळवळ (मार्क्सवाद, इस्लाम, चर्च)
  • भारतीय राष्ट्रावादाचा विकास
  • हिंदी राष्ट्रवाद (फाळणीपर्यंत)
  • भारतीय कम्युनिस्ट, इस्लाम व ख्रिस्ती समाज (स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भूमिका)
  • हिंदुत्व आणि राष्ट्रवाद (स्वा. सावरकरांची भूमिका)
  • हिंदुत्व आणि राष्ट्रवाद (रा.स्व.संघाची भूमिका)
  • लोकजीवनातील हिंदुत्व
  • भारतीय उपखंडातला राष्ट्रवादाचा विकास
  • राष्ट्रवादापुढची आव्हाने

Who can attend

आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादाच्या संदर्भात भारतीय राष्ट्रवादाचा म्हणजेच हिंदुत्वाचा, राज्यशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करू इच्छिणाऱ्या युवा कार्यकर्त्यांसाठी

Programme Dates: 25-26-27 March 2022

दि. २५ मार्च २०२२ सकाळी ०९.०० ते दि. २७ मार्च २०२२ संध्याकाळी ०५.०० पर्यंत

Batch Size

45

Medium:

मराठी

Fee Details

रु. 800/- मात्र (निवास, भोजन, अभ्यासक्रम साहित्यासह)

Sorry, but this form is no longer accepting submissions.

Programme Coordinator(s)

For any query on this course please contact

Gandhar Bhandari, 8851366407, gandharb@rmponweb.org
Dilip Navele 9967429456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org

BATCH I : Report of हिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १२ वर्षे हिंदुत्त्व अध्ययन परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जातो. हिंदुत्त्वाच्या कार्यातील युवा कार्यकर्ते व अभ्यासकांसाठी रचना करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात यंदा १५ जिल्ह्यातील ५६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे प्रचारक सुमंत आमशेकर या अभ्यासक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी अभ्यासक्रमामागची भूमिका सर्वांसमोर मांडली. हिंदुत्त्वाचे कार्य केवळ भावनिक असणे योग्य नाही तर त्याबाबत तर्कसंगत मांडणी कार्यकर्त्यांना करता यावी म्हणून किमान आवश्यक विषयांचा परिचय होण्यासाठी हा अभ्यासक्रम आहे.

उद्घाटक सुमंत आमशेकर यांनी पश्चिमेतील राष्ट्रवादाची पार्श्वभूमी संघर्षाची असल्याचे सांगतानाच आपल्याकडे विविधता असूनही समन्वयातून एक समृद्ध जीवन उभे राहिल्याचे सांगितले. हिंदू विचारात सर्व चराचरात एकच तत्व असल्याची मानसिकता विकसित झाल्यामुळे आपली दिशा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादाचा उदय आणि वाटचाल या विषयाने अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. मुंबईतील राज्यशास्त्राच्या  निवृत्त प्राध्यापिका मृदुला देवस्थळे यांनी हा विषय मांडला. युरोपात काही शतकांपूर्वी ही संकल्पना आली आणि जगभरात त्याची वाटचाल होत असताना घडलेली स्थित्यंतरे त्यांनी सर्वांसमोर ठेवली. राष्ट्रवादाचे भाष्यकार या सत्रात तरुण अभ्यासक पार्थ बावस्कर यांनी निधर्मी राष्ट्रावादाबाबत रिशेल्यू ते केमाल पाशा अशा नऊ व्यक्तीमत्त्वानी केलेल्या कार्याचा परिचय दिला. आज कालबाह्य वाटत असली तरी स्वातंत्र्य आंदोलन यशस्वी करण्यासाठी हिंदी म्हणून उभे राहिले या भूमिकेतून हिंदी राष्ट्रवाद हा विचार पुढे आला होता. हा हिंदी राष्ट्रवाद विषय ज्येष्ठ विचारवंत अरविंद कुळकर्णी यांनी सर्वांना समजावून सांगितला.

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी साम्यवाद्यांची स्वातंत्र्यापूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील भूमिका या विषयावरील सत्रात सह्भागींना मार्गदर्शन केले. साम्यवाद्यांची विविध आंदोलने, त्यांच्या निष्ठा, भूमिका या स्वातंत्र्यापूर्व काळात कशा होत्या हे त्यांनी सांगितले. तर स्वातंत्र्योत्तर काळात १९६२ चे चीनच्या भारतावरील आक्रमनातील त्यांची भूमिका, शैक्षणिक – वैचारिक  क्षेत्रावर अधिकार प्राप्त करून त्यांनी स्वत:चे निर्माण केलेले स्थान आणि त्यातून उभ्या राहिलेल्या प्रश्नांचा त्यांनी उहापोह केला. ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजाची स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यापूर्व काळातील भूमिका या दोन सत्रांमध्ये विचारक आणि कार्यकर्ते विराग पाचपोर यांनी मांडणी केली. या दोनही समाजाचे उद्देश, तत्त्वज्ञान, कार्यपद्धती आणि मानसिकता या अनुषंगाने त्यांनी सर्वांसमोर काही उदाहरणे ठेवत विषय मांडणी केली.

ज्येष्ठ विधीज्ञ किशोर जावळे यांनी राष्ट्रवाद आणि सावरकर हा विषय मांडला. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामापासून ते हिंदुत्त्वाची भूमिका प्रखरपणे मांडेपर्यंतच्या सावरकरांच्या वैचारिक तर्कशुद्धतेचा परिचय तर त्यांनी करून दिलाच. पण देशासमोरील विविध प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा राष्ट्रवादी दृष्टीकोणही त्यांनी साधार सर्वांसमोर ठेवला.  राष्ट्रवादासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी मांडली. राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्त्व हे सारखेच शब्द आहेत असे संघ मानतो आणि त्यामुळे राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणे म्हणजे हिंदू असणे ही संघाची धारणा असून आपली संस्कृती, पूर्वज, मानबिंदू या आधारे त्यांनी आपला विषय मांडला.

लोकजीवनातील हिंदुत्त्व या सत्रात सा. विवेकचे सहसंपादक रवींद्र गोळे यांनी विषयाची मांडणी केली. सर्व सृष्टीत एकच तत्त्व असून त्या अनुषंगानेच विविध समाजात असलेल्या प्रथा-परंपरा, संकेत, नीती नियम निर्माण झाले आणि त्याचे पालन करण्याची मानसिकताही समाजात विकसित झाल्याचे त्यांनी सोदाहरण सांगितले.

भारतीय उपखंडातील राष्ट्रवादाचा विकास या सत्रात राज्यशास्त्राचे प्राध्यापक (निवृत्त) अविनाश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय उपखंडातील पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका आदी देशातील राष्ट्रवाद विकास संदर्भातील स्थित्यंतरे त्यांनी सह्भागींसमोर मांडली. अभ्यासक्रमाच्या समारोप सत्रात सहभागींनी आपले अभिप्राय व्यक्त केले तर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते यांनी आपले विचार मांडले. प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे समारोप सत्राचे मुख्य वक्ता होते. भारतात विविधता असूनही समन्वयातून भारत हे प्राचीन व समृद्ध राष्ट्र होवू शकले. मात्र स्वातंत्र्यानंतर निधर्मीपणाचा चुकीच्या पद्धतीने केलेला प्रयोग आणि त्यातून निर्माण झालेला दुजाभाव असो वा विविध समाजात विघातक प्रवृत्तींचा शिरकाव आणि त्यातून समरसतेसारख्या विषयाला येणारी बाधा अशी राष्ट्रवादासमोर वर्तमानात उभी असलेली आव्हाने त्यांनी सर्वांसमोर ठेवली.

सहभागी आणि समारोप सत्रातील मान्यवरांचे आभार प्रकट करून या चार दिवसीय अभ्यासक्रमाची सांगता झाली.